मुंबई - फिलाडेल्फियातील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात 'मराठमोळ्या' अमेरिकावासीयांच्या वेशभूषेतूनही मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक वेगळेपण ठसविणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरी, पेशवाई आणि नागपुरी मेजवानीचा थाट आणि शालू-पैठणी, नथ, कोल्हापुरी साज आणि 'इरकली' साड्यांनी 'मराठी संस्कृतीरंगां'ची उधळण फिलाडेल्फियाच्या कन्व्हेन्शन सेंटरला सुखावून टाकणार आहे. मराठमोळ्या वेशभूषेची माहिती देणारा असाच एक 'ई-मेल' 'इनबॉक्स'मध्ये थडकताच अधिवेशनाच्या हजेरीसाठी आसुसलेल्या 'सगळ्या जणीं'ची साड्या खरेदीसाठी धावपळ सुरू झाली...
अमेरिकेच्या संस्कृतीशी एकरूप होतानादेखील मराठीप्रेमाचा धागा कायम राहावा म्हणून अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे होणाऱ्या या अधिवेशनाकडे जगभरातील मराठीजनांचे डोळे लागलेले असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून माहिती महाजालावरील 'मायबोली डॉट कॉम' नावाच्या 'मायबोलीशी नाते सांगणाऱ्या पाऊलखुणां'मधील फिलाडेल्फिया अधिवेशनाचा कप्पा उत्साहाने ओसंडून वाहतोय. अधिवेशनाची आखणी सुरू झाली आणि अमेरिकेतील या 'मायबोलीकरां'च्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले. अधिवेशनाचा दिवस जवळ येत चालला, तसा हा धागा संवादाची गुंफण करत आणखी घट्ट होत चालला. कोण कुठून येणार, कुणी कुठे भेटायचे, कुणाला कोणत्या कार्यक्रमात पाहायचे, याची आखणी सुरू झाली... कुणाची राहण्याची सोय नव्हती, तर कुणाला सोबत नसल्याने हजर राहता येणार नव्हते. ऐनवेळी नोंदणी मिळेल की नाही, या चिंतेने कुणी हुरहुरत होते, तर कुणाला आशा भोसलेंचे गाणे 'जवळून' ऐकण्याची ओढ लागली होती. जेवणाच्या पंक्ती बसणार, की उभ्याउभ्याच जेवायचे, अशा शंकाही कुणाच्या मनात उमटत होत्या, तर काहींनी पहिल्याच दिवशी जेवणाच्या टेबलावरच 'गेट टुगेदर' करण्याची टूम काढली होती. कुणी सीएटलच्या अधिवेशनातील चवदार जेवणाच्या आठवणीत रमले होते, तर फिलाडेल्फियात 'चायनीज' किंवा 'सॅन्डविच'चा नाश्ता असेल तर... या शंकेने कुणी उगीचच हुरहुरत होते... शुक्रवारी, 3 जुलैच्या 'पेशवाई' जेवणासाठी पैठणी साडी, नथ, आणि साजेसे दागिने, नऊवारी असा मराठमोळा साज असेल, तर रात्रीच्या 'कोल्हापुरी' जेवणाच्या वेळी काठपदराची हिरवी इरकली साडी, कोल्हापुरी साज असा थाट असेल... लग्नातला शालू नंतर फारसा वापरला जात नाही म्हणून शनिवारच्या 'नागपुरी' जेवणाच्या पंक्तींना 'शालू'चा झगमगाट असेल... कोल्हापुरी साज मिळवण्यासाठी अनेकींनी महाराष्ट्रातल्या आपल्या नातेवाइकांच्या 'मेलबॉक्स'चा आधार घेतलाय...
अमेरिकेतील मराठी मने मराठी मातीत गुरफटलेलीच असतात... कधीतरी गावाची, मातीची ओढ त्यांनाही अनावर करते आणि गावाकडच्या आठवणींचे काहूर मनात माजते... मग ही माणसे एकमेकांच्या अधिक जवळ येतात, आणि मराठी संस्कृतीचा प्रत्येक सोहळा मनापासून साजरा करतात... मराठमोळेपण जपतानादेखील, अमेरिकेच्या मातीने दिलेले मोठेपण ही मराठी मने विसरत नाहीत... 4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. त्यामुळे त्या रात्रीच्या 'मालवणी' जेवणाच्या वेळी, वेशभूषेतून अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रध्वजांच्या रंगांचा सुंदर मिलाफ घडविण्याचाही आयोजकांचा मनोदय 'कानोकानी' होत सर्वत्र पोचला आहे...
http://beta.esakal.com/2009/07/02223240/maharashtra-mumbai-marathi-phi.html
Friday, July 3, 2009
'संस्कृतीरंगां'ची उधळण...
Posted by DINESH GUNE at Friday, July 03, 2009 0 comments
Saturday, June 27, 2009
सेतू झाला रे सागरी...
महाराष्ट्राचे आणि समुद्राचे एक अनोखे भौगोलिक नाते आहे. मुंबईचे तर याच समुद्राशी आणखीनच जवळचे नाते आहे, कारण मुंबई फक्त समुद्राच्या किनाऱ्याचे एक महानगर नाही, तर बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या शहर जिल्ह्यालाही समुद्राने वेढले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर वळणांवरचा रात्रीचा झगमगाट प्रत्येकालाच भुरळ घालतो, म्हणूनच मरीन ड्राईव्हचा राणीचा रत्नजडित कंठहार हे देश-विदेशातील पर्यटकांचे आणि पोटापाण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचे पहिले आकर्षण असते. उत्तर भारतातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईवर आदळणाऱ्या लोंढ्यांनी कधी समुद्र पाहिलेलाच नसतो. म्हणूनच मुंबईत पाऊल ठेवणाऱ्या उत्तर भारतीयांचे कान समुद्राची गाज ऐकण्यासाठी आसुसलेले असतात आणि नोकरीधंद्यात जम बसला नाही, तर याच समुद्राच्या सुंदर चौपाट्या त्यांना चाट आणि भेलपुरी किंवा अगदीच काही नाही, तर शेंगदाणे विकून गुजराण करण्याचाही मार्ग दाखवतात. मग जुन्या मुंबईकरांबरोबरच, या नवख्यांचेही समुद्राशी नाते जडून जाते.... आद्य मुंबईकर म्हणून ओळखला जाणारा कोळी समाज याच समुद्राच्या विश्वासावर इथे स्थिरावला आणि मुंबईची लहान लहान गावठाणे बघता बघता इतिहासजमा होत महानगरात सामावत गेली. म्हणून समुद्र हे मुंबईचे सौंदर्य आहे आणि साधनही आहे.
.... आता या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. मरीन ड्राईव्हच्या क्वीन्स नेकलेसपेक्षाही झगमगणारा, मुंबईचा इतिहास आणि भविष्य यांना जोडणारा एक आगळा सेतू येत्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून मुंबईच्या वैभवात भर घालणार आहे. मुंबई आणि समुद्राचे नाते आता आणखी घट्ट होणार आहे. आजवर मुंबईला केवळ किनाऱ्यापलीकडून न्याहाळणारा समुद्र आता आपल्या अंगाखांद्यावरही खेळवणार आहे. अभियांत्रिकीचे एक नवे आश्चर्य मानले जावे, असा वरळी-वांद्रे सागरी सेतू तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे नाते जोडायला सज्ज झाला आहे आणि मुंबईच्या सर्वांत भीषण समस्येवरचा- वाहतूक कोंडीवरचा तोडगाही ठरणार आहे.
येत्या 30 जूनला या सागरी सेतूचे उद्घाटन होईल आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारा एकमेव माहीम कॉजवेचा रस्ता दिलासा मिळाल्याने काहीसा सुखावेल. दररोज जवळपास सव्वा लाख वाहनांची अहोरात्र ये-जा पाहणारा हा एकमेव रस्ता वांद्य्राच्या समुद्रावरून किनाऱ्यावर आदळणाऱ्या एखाद्या लाटेनं दिलेल्या सागरी सेतूच्या प्रगतीच्या बातम्यांनी दिवसागणिक सुखावत गेला असेल... आता हा सेतू साकारलाय, हे "ऑफिशियल' सत्य सगळीकडेच झालेय... म्हणून, मुंबईच्या इतिहासातून वर्तमानापर्यंतच्या बदलांचा साक्षीदार असलेल्या या स्वामी विवेकानंद मार्गालाही त्या दिवसाची ओढ लागली असेल.... येत्या दोन-चार दिवसांत या मार्गाच्या दुतर्फा बांबूंचे बॅरिकेड्स लागतील... पोलिसांची वर्दळ वाढेल.... रस्त्यावरून अहोरात्र धावणाऱ्या काही वाहनांच्या वर्षानुवर्षांच्या सहवासालाला आता आपण मुकणार, या जाणिवेने हा रस्ता मूकपणे व्याकूळदेखील होईल, पण दुसऱ्याच क्षणाला तो सुखावूनही जाईल. कारण त्याने मुंबईच्या प्रगतीच्या प्रत्येक पावलाच्या साक्षीदाराची भूमिका निभावलेली आहे. उपनगरातल्या वांद्य्राचं शहरातल्या वरळीशी आणखी जवळचे नाते जोडणाऱ्या या सेतूचा मग त्यालाही अभिमान वाटेल... जवळपास प्रत्येक मुंबईकराला केवळ वासाने ओळखीची असलेली माहीमची खाडीदेखील या नव्या आश्चर्याच्या सहवासाने आनंदून जाईल....
गेल्या काही वर्षांपासून स्वामी विवेकानंद मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाचे डोळे समुद्रात आकार घेणाऱ्या त्या अवाढव्य सेतूच्या प्रगतीकडे लागलेले होते. जवळपास 50 हजार आफ्रिकन हत्तीच्या वजनाएवढा अवाढव्य आणि केबलच्या ताणामुळे कित्येक टन वजन सहज पेलविण्याची क्षमता असलेल्या या सेतूच्या उदरात, अवघ्या पृथ्वीला विळखा घालू शकेल इतक्या लांबीच्या लोखंडी तारांचे जाळे सामावलेले आहे, असं सांगतात, कुतुबमिनारच्या 63 पट उंचीच्या या पुलाच्या उभारणीसाठी 90 हजार टन सिमेंटचा वापर झाला आहे.
माहीम कॉजवेवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात रहदारीची कोंडी अगदी ठरलेलीच असल्याने वरळी आणि वांद्रे हे आठ किलोमीटरचे अंतर कापायला सव्वातासाचा वेळही ठरलेलाच. पण आता, या सागरी सेतूने हे समीकरण संपवलेय. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे मुंबईला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आहे. वाहनांमधून सोडल्या जाणाऱ्या कार्बनयुक्त धुराचा विळखा मुंबईला पडला आहे आणि प्रदूषणामुळे आरोग्याच्याही समस्यांनी मुंबईला वेढले आहे. सव्वातासाची वाहतूक सात मिनिटांपर्यंत खाली आणणारा हा सेतू मुंबईच्या आरोग्यासाठीही एक वरदान ठरू शकेल. कारण एकाच गतीने समुद्रावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, या वाहतूक कोंडीमुळे होणारी मौल्यवान इंधनाची हकनाक नासाडीही संपुष्टात येणार आहे. प्रवासाचा वेळ एक दशांशाइतका खाली आणणाऱ्या या सागरी सेतूमुळे दर वर्षी 100 कोटी रुपयांची इंधनबचत होईल, असा अंदाज या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतात. खरे तर, ठरल्या वेळात या सेतूची उभारणी पूर्ण असती, तर सुमारे 350 कोटी रुपयांची बचतही झाली असती. पण वेगवेगळ्या पर्यावरणविषयात समस्या आणि त्यावर न्याय मिळवण्यासाठी पर्यावरणाचा आग्रह धरणाऱ्यांनी केलेला पाठपुरावा यांमुळे या सेतूचे कामही अपेक्षेपेक्षा सुमारे पाच वर्षांनी लांबले आणि मुळापासून कराव्या लागलेल्या रचनात्मक बदलांमुळे खर्चदेखील वाढला.... मुळात 1306 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प या बदलांमुळे 1650 कोटींवर गेला. पण या सगळ्या समस्यांवर मात करून हा सेतू आता साकारलाय...
या सागरी सेतूने मुंबापुरीला एक नवे वैभव आणि आगळे महत्त्व मिळवून दिले आहे, हे खरे असले, तरी काही समस्यादेखील उद्भवण्याची शंका व्यक्त केली जाते. मुळात, हा सागरी सेतू आठ पदरी आहे. म्हणजे, या सेतूवरून एका वेळी ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या स्वामी विवेकानंद मार्ग किंवा वरळीच्या रस्त्यापेक्षा कितीतरी जास्त असेल, हे स्पष्ट आहे. पण एकाच वेळी या सेतूवर प्रवेश करणारी वाहने जेव्हा कोणत्याही बाजूने बाहेर पडतील आणि पुन्हा रस्त्यावर मिळतील, तेव्हा हे रस्ते मात्र, जुनेच तीन-चार पदरी असतील. त्यातही वांद्रे आणि वरळी या दोन्ही ठिकाणी या सेतूच्या मुखाशीच असलेल्या वस्तीमुळे, अनेक जागी रस्त्यांवरच वाहने उभी केली जात असल्याने हे रस्ते आणखीनच चिंचोळे झाले आहेत. एकदम आठ पदरी रस्त्यावरून या चिंचोळ्या रस्त्यांवर थडकणाऱ्या वाहनांना सामावून घेण्याची या रस्त्यांची क्षमता तोकडी पडेल आणि सागरी सेतूच्या तोंडाशीच वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळेल, अशीही भीती काही जण व्यक्त करतात.
पण ही समस्या काही फारशी गंभीर नाही, कारण मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उत्तरे शोधण्यात गेल्या काही वर्षांपासून इथले वाहतूकतज्ज्ञ वाकबगार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फ्लायओव्हर उभारले गेले. वाहतुकीची समस्या सुटेल. प्रवासाला लागणारा वेळ वाचेल आणि इंधनातही बचत होईल, असा त्यामागचा प्रामाणिक तिहेरी हेतू होता. पण उड्डाणपूल झाले आणि मुंबईतील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. साहजिकच, रस्ते अपुरे पडू लागले आणि कोंडीची समस्या कायमच राहिली. आता सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीतल्या नॅनो गाड्या रस्त्यावर येतील, आणि पुन्हा एकदा हीच समस्या निर्माण होईल. तेव्हा वरळी-वांद्रे सागरी सेतू या समस्येवरचा तोडगा ठरू शकेल का, हाही शंकास्पद मुद्दा आहे. कारण, या सेतूच्या उभारणीसाठी झालेला कोट्यवधींचा खर्च वसूल करण्यासाठी या सेतूचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवरच टोल बसविला जाणार आहे. टोल प्रत्येकालाच परवडेल अशी स्थिती नाही. टोलचे दर निश्चित झालेले नाहीत. पण एका खेपेसाठी 50 ते 75 रुपये टोल आकारला जाईल, असे सांगितले जाते. साहजिकच, ज्यांच्या खिशाला हा आकार परवडेल आणि ज्यांना वरळी-वांद्रे प्रवासातील नऊ दशांश वेळ वाचवायची खरी आवश्यकता असेल अशा लोकांकरिताच हा सेतू वापरात राहील आणि सर्वसामान्य वाहनचालक मात्र, जुन्याच स्वामी विवेकानंद मार्गावरून ये-जा करत या सेतूचे वैभव न्याहाळत राहतील.
पण ही स्थिती काही फार काळ राहणार नाही. कारण अशा समस्यांवरही तोडगा काढणे ही वाढत्या आणि वाहत्या मुंबईची गरजच असेल. काही वर्षानंतर, याच सेतूवरून सगळी मुंबई सागराशी लगट करत धावू लागेल...
माहीमच्या खाडीवरून जाणाऱ्या स्वामी विवेकानंद मार्गाला कदाचित हा भविष्यकाळदेखील पाहावा लागेल....
(sakal, June 27, 2009)
Posted by DINESH GUNE at Saturday, June 27, 2009 0 comments
Friday, June 26, 2009
अण्णांचा आशीर्वाद
शिर्डीहून संगमनेरकडे परतताना निमगाव जाळीजवळ आमच्या लाल-पिवळ्या मारुती ओम्नीनं झटका घेतला आणि मी एकदम जागा झालो. गाडी पट्टी सोडून रस्त्याच्या कडेला आली होती. ड्रायव्हर भेदरलेला दिसत होता. थोडेसे सैलावलेले दहा-बारा प्रवासीही झटक्यात जागे झाले होते.
एक अवजड ट्रक आम्हाला हूल देऊन भन्नाट वेगानं पुढे गेला होता... ड्रायव्हरने त्याच्या भाषेत त्या ट्रकला शेलकी विशेषणं वापरली आणि पुढे पळणाऱ्या ट्रककडे बघून तो उपहासाने हसला.
"काय झालं...?' मी विचारलं.
त्यानं डोळ्यांनीच ट्रकच्या पाठीवर लिहिलेली अक्षरं मला दाखवली..."अण्णांचा आशीर्वाद'
"आजकाल कुणीही उठतंय आणि अण्णांचा आशीर्वाद मिळाल्यावर कसं पन वागायला लागतंय...' तो बोलून गेला आणि माझं कुतूहल चाळवलं. हा कुठल्या अण्णांबद्दल बोलतोय, हे मला समजत नव्हतं.
तोवर आमच्या गाडीचा ड्रायव्हर आणि माझ्यासकट सगळी गर्दी सावरली होती. त्याच्या या वाक्यावर बाकीचे सगळे समजल्यागत हसले. मी मात्र कोराच होतो. त्यानं हे ओळखलं असावं.
"अहो, आमच्याकडले सगळे उमेदवार ऊठसूट पारनेरला चाललेत. अण्णांना भेटून येत्यात आणि जनतेला सांगतात, अण्णांनी आशीर्वाद दिलाय म्हणून... अण्णांचा आशीर्वाद म्हणजे विजयाची खात्री...' तो म्हणाला आणि मी समजून गेलो.
अण्णा म्हणजे अण्णा हजारे... तो नगर मतदारसंघातल्या उमेदवारांबद्दल बोलत होता. हूल मारून पळून जाणाऱ्या त्या ट्रकच्या पाठीवरल्या अक्षरामुळे अण्णा हजारेंच्या आशीर्वादाचं प्रचारासाठी भांडवल करणाऱ्या उमेदवारांबद्दलची त्याची भावना जागी झाली होती.
संगमनेरला पोचलो. अण्णा हजारेंच्या कार्यालयात फोन लावला. अनिल शर्मांशी बोलणं झालं आणि कोडं आणखी उलगडत गेलं.
निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरू लागल्यापासून नगर जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवारांची अण्णांच्या दर्शनासाठी रीघ लागली होती.
अण्णांचे आशीर्वाद घेऊन परतलेले हे उमेदवार मग प्रचारातही त्याचा वापर करीत होते, हे लक्षात आल्यावर अण्णांना त्याचा इन्कार करावा लागला होता.
माझे आशीर्वाद म्हणजे पाठिंबा नव्हे, हे स्पष्ट करून अण्णांनी मतदार जागृतीची एक मोहीमच सुरू केली. सत्कर्म करणारा, जनतेचे प्रश्न सोडवणारा आणि जनतेच्या समस्यांची जाण असणाऱ्या उमेदवारालाच मत द्या... असं आवाहन करणारी पत्रकं मग अण्णांनी राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात पाठवली.
नगर मतदारसंघातले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजीराव कर्डिले, कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार राजीव राजळे आणि भाजपचे दिलीप गांधी या सर्वांनीच अण्णांचे आशीर्वाद घेतले होते; पण अण्णांचा पाठिंबा मात्र मिळाला नाही. परंतु यामुळे अण्णांची मोहीम राज्यभर पसरली.
मात्र, या निकषात बसणारे उमेदवार बहुधा त्यांनाही मिळाले नाहीत.
संपूर्ण राज्यात अण्णांनी फक्त तीन मतदारसंघांमधल्या तीन उमेदवारांची शिफारस केली होती...
लोकांचे प्रश्न सोडवणारे, अन्यायाला वाचा फोडणारे आणि जनतेच्या प्रश्नावर आंदोलनं करणारे तीन उमेदवार लोकसभेत जावेत, अशी अण्णांची इच्छा होती.
महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये बहुधा सर्वत्र बहुरंगी लढती ल्हाल्या. राजकीय पक्षांचा, आघाड्यांचा आणि युतीचा पाठिंबा असलेले अनेक नामांकित उमेदवार रिंगणात उतरले होते.
नगर जिल्ह्यातल्या उमेदवारांनी केलेली अण्णांची दर्शनवारी फारशी फलद्रूप ठरली नाही. "अण्णांचा आशीर्वाद' प्रचारात आणण्याचे प्रयत्न फुसके ठरल्यावर मग नेहमीचीच प्रचारनीती सुरू झाली. लालकृष्ण अडवानी दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा, काळा पैसा अशा विषयांवर बोलून गेले. शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्नांना हात घातला.
नगरचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे राज्यातल्या कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार समितीचे नेतृत्व असल्यामुळे ते नगरमध्ये फारसे नसतात, असं लोक म्हणतात. राजळे म्हणजे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे. त्यांनी बंडखोरी केली असली, तरी थोरातांनी आघाडीचा धर्म पाळायचं ठरवलेलं. दिलीप गांधींच्या प्रचारात "युती' दिसत नाही, असं काहींचं म्हणणं...
नगरमध्ये कोण निवडून येईल, ते सांगता येत नाही, असंच उत्तर कोणीही देत होतं.
निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसा कुणातरी एकाचा विजय निश्चित होईल, असं म्हटलं जायचं...
...आणि निवडणुका पार पडेतोवर अण्णांच्या आशीर्वादाचं प्रकरणही फारसं ताजं राहिलेलं नव्हतंच!
Posted by DINESH GUNE at Friday, June 26, 2009 0 comments
Friday, June 19, 2009
एक धागा...
लाल सिग्नल पडल्यानंतरही त्या गाडीने सुसाट वेगात रस्ता ओलांडला आणि पाठोपाठ एक जोरदार शिट्टी घुमली. करकचून ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या कडेला आली, आणि एका क्षणात थांबली. मुंबईत अजूनही ट्रॅफिक पोलिसाच्या शिट्टीचा दबदबा आहे. पोलिसानं अडवल्यानंतर काय केलं म्हणजे रहदारीच्या नियमांतून "सुटका' होते, याचा अनुभव मुंबईतल्या जवळपास प्रत्येक वाहनधारकाला कधी ना कधी आलेला असतो. म्हणूनच, शिट्टी वाजली, की थांबायचं, ही "शिस्त' मुंबईच्या वाहनधारकांनी स्वतःहून अंगी बाणवली आहे. 
म्हणूनच, या गाडीचा वेगही शिट्टीच्या आवाजानं रोखला गेला. गाडी थांबली आणि लपल्यासारखा रस्त्याकडेच्या आडोशाला उभा राहिलेला एक ट्रॅफिक हवालदार झपाट्यानं पुढे आला. कुठल्यातरी "एअरलाईन्स'च्या केटरिंग सर्व्हिसची ती व्हॅन होती. वेळेत विमानतळ गाठायचा म्हणून बहुधा भरधाव चालली होती. हवालदार जवळ येताच गाडीच्या डाव्या खिडकीतून एक हात पुढे आला आणि हवालदाराचे दोन्ही हात पुढे झाले...
असं काही दिसलं, की सामान्य माणसांचं कुतूहल नेहमीच जागं होतं. त्या गाडीच्या पाठोपाठ मी त्याच दिशेनं जात होतो. माझंही कुतूहल जागं झालं आणि वेगही मंदावला. माझे डोळे आता गाडीच्या डाव्या खिडकीला खेटून उभ्या असलेल्या हवालदाराकडे लागले होते. खिडकीतून थंडगार पाण्याच्या तीनचार बाटल्या बाहेर आल्या होत्या. हवालदारानं त्या बाटल्या हातात घेतल्या आणि तो मागे वळला. गाडी पुढे सरकली आणि आधीच्याच वेगानं विमानतळाच्या दिशेने निघाली.
हवालदार पुन्हा त्याच्या नेहमीच्या आडोशाला जाऊन बसला होता. शातंपणे त्यानं हातातल्या बाटल्यांपैकी एक बाटली उघडली, आणि बाटलीवरच्याच प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पाणी भरून घटाघटा पिऊन संपवले.
भर दुपारचे उन्ह रस्त्यावर रणरणत होते.
हवालदारानं खिशातून रुमाल काढला. बाटलीतलं पाणी रुमालावर शिंपडलं, आणि सगळ्या बाटल्यांभोवती तो ओला रुमाल गुंडाळला. बाजूच्याच सिग्नल बॉक्समध्ये सगळ्या बाटल्या काळजीपूर्वक ठेवल्या, आणि शिट्टी तोंडातच ठेवून तो पुन्हा ड्यूटीवर दाखल झाला...
... दुपारचा हा अनुभव खरं म्हणजे नोंदवून ठेवावा असा नव्हता. नंतर रेल्वे स्टेशनवर पोहोचून गाडीत बसल्यावर तो प्रसंग मी विसरूनदेखील गेलो होतो. चर्चगेटला उतरून थेट विधानसभेत पोहोचलो, तेव्हा राजकारण, गुन्हेगारीकरण आणि कायदा सुव्यवस्था असे शब्द विधानसभेच्या परिसरात "दुमदुमत' होते.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री आणि उस्मानाबादचे नवनिर्वाचित खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना त्याच दिवशी "सीबीआय'ने अटक केली आणि राजकारण ढवळून निघालं. विधिमंडळात डॉ. पाटील यांची अटक गाजणार, हे अपेक्षितच होते.
विधानसभेत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेतून डॉ. पाटील यांच्या अटकेचे पडसाद सभागृहात उमटलेच. अपेक्षेप्रमाणे गदारोळही झाला, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या, आणि कायदा सुव्यवस्थेवरील सगळी चर्चा डॉ. पाटील यांच्या अटकेभोवतीच घुटमळणार असे चित्र निर्माण झाले. "राजकारणाचे गुन्हेगारीकरण' नावाचा गुळगुळीत (!) झालेला शब्द पुन्हा घासूनपुसून बाहेर आला, आणि विधिमंडळापासून प्रसार माध्यमांच्या पडद्यांवर सर्वत्र दुमदुमू लागला...
...याच गदारोळात पोलिसांच्या परिस्थितीवर एक हलकासा प्रकाशझोत विधानसभेच्या सभागृहात पडला, म्हणून मला त्याच दिवशी सिग्नलजवळ पाहिलेला तो प्रसंग सहज आठवला.
कायदा सुव्यवस्थेवरील चर्चेत गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेच्या सभागृहातून पोलिसांच्या परिस्थितीवर आश्वासक शब्दांचा शिडकावा केला, आणि दुपारच्या रणरणत्या उन्हात, सिग्नल तोडणाऱ्या एका गाडीला थांबवून दोनतीन पाण्याच्या बाटल्या "उकळणाऱ्या' त्या हवालदाराचा, थंड पाणी पिऊन संपल्यानंतरचा शांत चेहरा मला लख्ख आठवला...
जयंत पाटील यांनी विधिमंडळात दिलेला शब्द कृतीत उतरला, तर अशा असंख्य पोलीस हवालदारांना रणरणत्या उन्हातून घरी गेल्यानंतर सावली देणारं एक हक्काचं घर तरी मिळेल, असं वाटून मी उगीचच सुखावून गेलो. घरदार विसरून, उन्हातान्हात, रात्रंदिवस "ड्यूटी' बजावणाऱ्या सामान्य पोलीस हवालदारांच्या परिस्थितीवर स्वतः गृहमंत्र्यांनीच विदारक प्रकाशझोत टाकला होता.
... गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी बजावलेल्या कर्तृत्वाला मुंबईकरांनी सलाम केला. त्यामुळेच, सामान्य हवालदाराविषयीदेखील सामान्य माणसाच्या मनात आपुलकीची भावना दिसते. म्हणूनच, रस्त्याकडेला सिग्नलजवळ आडोशाला उभं राहून "सावज' पकडल्यासारखं एकाद्या वाहनचालकाला थांबवणाऱ्या हवालदाराच्या हातात "चिरिमिरी' कोंबताना, "लाच देणे हा गुन्हा आहे', हे विसरायला होतं. तुटपुंज्या, अनियमितपणानं मिळणाऱ्या पगारात हा "कायद्याचा रक्षक' घरादाराचा गाडा हाकताना मेटाकुटीला आलाय, हे एव्हाना तमाम जनतेला माहीत झालंय. मुंबईच्या हवालदाराला चांगलं घरही नाही, पोलीस वसाहतींची परिस्थिती दयनीय आहे आणि माणसांनी राहण्यायोग्य आरोग्यपूर्ण वातावरण तिथे नाही, हेही सगळ्यांना माहीत आहे. 26 नोव्हेंबरनंतर झालेल्या खांदेपालटात जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद आले, आणि लगोलग त्यांनी मुंबईतील पोलीस वसाहतींना भेटी दिल्या. पोलिसांशी संवाद साधला. आणि त्यांच्या कुटुंबाला सोसावे लागणारे हाल डोळ्यांनी पाहिले. गलिच्छ, मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतींमध्ये आणि चिखलाच्या पायवाटा तुडवत झोपडपट्ट्यांमधल्या आपल्या घरी रात्री अपरात्री पोहोचणाऱ्या हवालदारांच्या व्यथा जाणून घेतल्या...
त्या सभागृहात विरोधकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढल्यानंतर चर्चेच्या उत्तरात जयंत पाटील यांनी स्वतःच पोलिसांच्या या अवस्थेची कबुलीच दिली. पद्मसिंह पाटील यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, सरकार त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि तपासावर प्रभाव पडेल अशी कोणतीही भूमिका घेणार नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा खरा रक्षक असलेल्या पोलीस यंत्रणेच्या भल्याचा पाढा वाचला, आणि 26 नोव्हेंबरनंतर पोलिस खात्यातील त्रुटी आणि उणीवा प्रकर्षाने सामोऱ्या येऊ लागल्याचे उघड झाले. गुप्तवार्ता यंत्रणेपासून पोलिसांची बुलेटप्रुफ जॅकेटस, "फोर्स वन' कार्यान्वित होण्याची गरज आणि अगदी पोलिसांच्या मानसिक आरोग्यापर्यंतची प्रत्येक बाब आता ऐरणीवर आली आहे. पोलिसांचे कौटुंबिक स्वास्थ्य, त्यांचे प्रशिक्षण आणि कमरेला लटकावलेल्या शस्त्राची निगराणी यावरही कटाक्ष देण्याची गरज सरकारला भासू लागली आहे, हे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.
... आता पोलिसांना शस्त्रे चालविण्याचा सराव करता येईल. आता पोलिसांचे "फोर्स वन' पथक कार्यरत होईल आणि गुप्तवार्ता पथकात प्रशिक्षित अधिकाऱ्यांचा ताफाही दाखल होईल. दहशतवादविरोधी पथक आणखी सक्षम होईल. त्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्याचे अर्थमंत्र्यांनी मान्य केलंय, असा शब्द जयंत पाटील यांनी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिला आहे.
पद्मसिंह पाटील यांच्या अटकेचे वादळ राज्यात घोंघावत असल्याने, पोलिसांना दिलाशाचा शिडकावा देणारे जयंत पाटील यांचे ते शब्द अजून सभागृहाबाहेर फारसे पोहोचलेच नाहीत...
पण, त्याच दुपारच्या रणरणत्या उन्हात, रस्त्यावरच्या त्या हवालदाराला थंडगार पाण्यामुळे मिळालेले समाधान आणि सभागृहात जयंत पाटील यांनी केलेला आश्वासक शब्दांचा शिडकावा यांचा एक अदृश्य धागा मला जाणवून गेला. केवळ योगायोगाने!...
(Sakal, Saptarang, 14 June 2009)
Posted by DINESH GUNE at Friday, June 19, 2009 1 comments
Sunday, June 14, 2009
दिल मिले ना मिले....
`माणूस पहिल्यांदा कोणता विचार करतो?'... त्यानं मला विचारलं, आणि मी उत्तर न देता त्याच्याकडे बघत राहिलो.
त्याच्या प्रश्नाचा संदर्भ माझ्या लक्षात येत नव्हता. मी निवडणुकीविषयी बोलत होतो आणि त्यानं अचानक हा प्रश्न माझ्यासमोर फेकला होता.
`अर्थातच, समाजाचा!'... माझा कोरा चेहरा पाहून त्यानंच काही क्षणानंतर उत्तर दिलं. तरीही माझा चेहरा कोराच होता.
इतके दिवस, निवडणुकीचे रागरंग न्याहाळत फिरताना भेटलेली माणसं आपापल्या समस्यांनी त्रासली आहेत, असं मला वाटत होतं.
प्रत्येकाच्या समस्या मात्र समान होत्या. त्यामुळेच, त्या सामाजिक समस्या बनल्याचा माझा निष्कर्ष होता.
पण `माणूस पहिल्यांदा समाजाचा विचार करतो', असं तो म्हणाला तेव्हा मी विचार करायला लागलो.
नंतर त्याचं बोलणं जसजसं स्पष्ट होत गेलं, तसतसा माझा गोंधळही संपत गेला.
माणूस पहिल्यांदा समाजाचा विचार करतो, म्हणजे तो ज्या जातीचा आहे, त्याचा पहिल्यांदा विचार करतो... असंच त्याला म्हणायचं होतं.
`माणूस आपल्या समाजाच्याच उमेदवाराला मत देणार... मग तो कुठल्याही पक्षाचा असो'... त्यानं आणखी रोखठोक स्पष्ट केलं आणि मी अक्षरशः अचंबित झालो.
इथल्या मतदारांच्या मानसिकतेनं, राजकारण, निवडणुकांचे आडाखे यांची साधारणपणे आखली जाणारी गणितंच पुसून टाकली होती.
निकष फक्त एकच!... जात.
`माणूस फक्त जातीचा विचार पहिल्यांदा करतो... पक्ष नंतर' त्याचं हे मत मी ऐकलं आणि रावेर मतदारसंघातलं त्यावरच आधारलेलं विश्लेषणही ऐकण्यासाठी मी थोडासा पुढे झुकलो...
या मतदारसंघात लेवा पाटील समाजाच्या आणि मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती. म्हणजे, ज्या समाजाचे मतदार इथे सर्वाधिक मतदान करतील, तो उमेदवार निवडून येणार... तो कोणत्या पक्षाचा, हे महत्त्वाचे नाही... मी तर्क लढविला.
एरंडोल मतदारसंघ नकाशावरून पुसला गेल्यानंतर अस्तित्वात आलेला रावेर मतदारसंघ हा सर्वांत मोठा मतदारसंघ असल्याचा अभिमान इथल्या मतदारांमध्ये रुजला आहे. जवळपास 14 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात उमेदवार कितीही असले, तरी मराठा विरुद्ध लेवा पाटील अशी सरळ दुरंगी लढत आहे, असे मानतात. म्हणूनच, `आता नाही तर पुन्हा कधीच नाही' हे इथल्या दोन्ही बाजूंच्या प्रचाराचं परवलीचं वाक्य आहे.
`गेली असंख्य वर्षं एकाच समाजाचा खासदार निवडून दिला, आता बदल हवा. आता दुसऱ्या समाजाला लोकसभेत पाठवा,' असा संदेश एका बाजूने दिला जातो, तर `या वेळी हा बदल झालाच, तर पुन्हा आपल्या समाजाचा उमेदवार कधीच लोकसभेत जाणार नाही' असा प्रचार दुसऱ्या बाजूने केला जातो.
रावेर मतदारसंघातली लढाई ही दोन प्रस्थापित, राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांची आहे, हे केवळ म्हणण्यापुरतं... कारण, तिथल्या उमेदवारांची निवडणूक चिन्हं त्या पक्षांची आहेत; पण खरं तर इथली लढाई दोन प्रस्थापित समाजांमधील, जातींमधील राजकीय वर्चस्वाची...
...रावेरचं हे चित्र अगदी सुशिक्षित मतदारांमध्ये आणि अगदी सामान्य, अर्धशिक्षित किंवा अशिक्षितांमध्येही तसंच भिनलेलं...
उन्हाचा कडाका ओसरत असताना, संध्याकाळच्या वेळी तिथल्या एसटी स्टॅंडवर गर्दी सुरू होते... आसपासची माणसं आपापल्या गावी जाण्यासाठी तिथं जमतात. सहा आसनी रिक्षांमध्ये इंच-इंच जागेत मावेल एवढी गर्दी कोंबून झाली, की उरलेली गर्दी एसटीची वाट पाहत ताटकळते.
मग निवडणुकीच्याही गप्पा रंगत जातात. उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, त्याचं काम काय, तो समस्या सोडवतो की नाही, असले प्रश्न त्यात नसतात. तो कोणत्या समाजाचा आहे, हेच तिथे महत्त्वाचे असते. शिवाय, नाराजीचे मुद्दे असतातच...
`कशाला हवं हे मतदान...?' कुणीतरी वैतागल्यासारखा बडबडून जातो.
मग अचानक सगळेच गंभीर होतात.
`नाही... तो आपला हक्क आहे. तो बजावलाच पाहिजे... म्हणून तरी मतदान करायचंच'... एक जण आणखी गंभीरपणे बोलून जातो.
मग अशाच गप्पा मारतामारता कुणीतरी गर्दीतच एक शेर फेकतो...
`शहर अन्जाना है, लोग भी अनजाने है... हाथ तो मिलाते चलो, दिल मिले ना मिले ...
आणि गर्दी माना हलवत पसंती दर्शवते. गाडी येते, गर्दी पांगूनही जाते...
Posted by DINESH GUNE at Sunday, June 14, 2009 2 comments