Sunday, August 25, 2019

गोविंदा

थर थर वरवर
लावून भरभर
चढतो सरसर
गोविंदा ...
मनात हुरहुर
भयाण काहूर
धपापतो उर
गोविंदा... 
अखेरचा थर
निसटला जर
लटकतो वर
गोविंदा... 
खालुनि घुमतो
गर्दीचा स्वर
गोपाळा रे
गोविंदा!!

Wednesday, August 21, 2019

'भाषा' आणि 'नवता'...

बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. हे एकदा मान्य केले की आपोआपच बदल स्वीकारायची मानसिकता तयार होते. आणि आपण कसे बदलत गेलो तेही लक्षातदेखील येत नाही. फार पूर्वी, सातआठ पिढ्यांपूर्वी आपल्या घरातली पुरुष मंडळीचा ‘पंचा उपरणं पागोटं’ असा वेश असायचा, बायका ‘लुगडं’ नेसायच्या. काळाबरोबर बदल होत गेला, आणि पंचाउपरण्याची जागा ‘धोतर सदऱ्या’ने घेतली. कालांतराने समाजातच सुधारणा होऊ लागली, विकास होऊ लागला, पायी चालण्याऐवजी मोटारी दिसू लागल्या, आणि सदऱ्यावर ‘कोट’ आला. ‘वहाणां’ची जागा ‘चप्पल’ने घेतली. पुढे काळ आणखी बदलला. धोतर कोट सदऱ्याची जागा ‘पॅंट शर्ट’ने घेतली, चप्पलऐवजी ‘बूट’ आले. पुढे ‘सूट’ आला, पायात ‘शूज’ आले, गळ्यात ‘टाय’ आला, डोक्यावर ‘कॅप’ आली. आता ‘ब्लेझर्स’ वगैरे वापरतो...
हा केवळ वेषातला बदल आहे असे वरवर वाटत असले तरी ते तेवढेच नाही.
मराठी भाषा या वेषाबरोबरच कशी बदलत गेली, त्याचं प्रतिबिंबही या बदलातून दिसतं.

भाषेच्या विकासाची प्रक्रिया सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. तेव्हा फक्त वर्तमानकाळाची भाषा होती. पुढे तीस हजार वर्षांनंतर भूतकाळाची भाषा आली. आता आपण भविष्यकाळाच्याही पुढची भाषा बोलत आहोत, म्हणून मराठीचं काय होणार याची कधीकधी चिंता व्यक्त होते.

मागे कधीतरी, ‘पुण्याच्या’ एका एफ्. एम्. स्टेशनवर ‘सलग ३० सेकंद मराठीत बोलून दाखवा’ अशी स्पर्धा घेत होते. ‘पुण्यात’!
कुणीही बोलू शकले नाही, असं मला कळलं!

मराठीत इंग्रजीची मोठी घुसखोरी झाली आहे.
मागे एकदा, १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुपारी बारा-साडेबारा वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर एक भाषण ऐकलं. मराठीतून होतं. ते मी ऐकता ऐकता लिहून घेतलं...

“बाॅडी आणि माईंड यांच्यावर नाॅईज पोल्यूशनचा डायरेक्ट ॲडवर्स इफेक्ट होत असतो. म्हणून लहान मुलांच्या एरियातील नाॅईज पोल्यूशनचे नाॅर्म्स स्ट्रिक्ट असायला हवेत. या सगळ्याचा विचार करून सायन्स रिलेटेड काही गाईडलाईन्स आहेत, ज्या ॲक्ट्व्हिस्टसनी थरो रिसर्च करून चाॅकआऊट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियाला किती नाॅईज एक्स्पोजर असायला हवेत त्याचा सीरियसली विचार करायला हवा. इन शाॅर्ट, नाॅईज पोल्यूशनला लाईटली घेऊन चालणार नाही. कारण ते हेल्थ हजार्ड आहे. इररिव्हर्सिबल हियरिंग लाॅस झाला नाही तरी बरेचसे ॲडव्हर्स इफेक्टस होऊ शकतात हे सायन्सने सिद्ध केले आहे.”

नंतर हे मी एका मित्राला ऐकवलं. त्याने खांदे उडवले. तो म्हणाला, ‘इट हॅपन्स! ॲट टाईम्स मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं!’

भाषाप्रदूषण. मराठी मरणार नाही, पण प्रदूषित होणार.

या पार्श्भूमीवर मला भाषातज्ञ गणेश देवींचं एक वाक्य कायम आठवतं-
“भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते- भाषा टिकवणे आपल्या हातात नसेल पण ती मारून टाकू नये. कारण भाषा आपण निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या मारण्याचा अधिकार आपल्याला नाही.”
भाषा जागविणे म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जागविणे. आपण स्वत:ला तसे जगविले तर भाषा मरणार नाही.
फक्त सध्या आपण भाषा मारतो आहोत की समृद्ध करत आहोत याचा विचार करायला हवा. अर्थात आज एकाच भाषेवाचून काही अडत नाही अशी स्थिती असल्याने आपण भाषेच्या अस्मितेची फार चिंता करत नाही.
पण कुणीतरी करायला हवी. करताहेत...
त्यांना सलाम !!

'मंदीचा फेरा'

काही गोष्टी आपण उगीचच खाजगीपणाच्या नावाखाली लपवितो किंवा सांगायला लाजतो आणि त्याचे भयंकर व्यापक असे सामाजिक परिणाम होतात. तेही आपल्यालाच भोगावे लागतात, हे वेगळेच! या परिणामांचा प्रभाव कमी करायचा असेल तर खाजगीपणा म्हणून उघड न करावयाच्या काही गोष्टी सर्वांनी एकमेकांशी शेअर कराव्यात, त्याचा प्रसार करावा असे वाटते.
आजकाल सोशल मीडियामुळे विचारांचे आदानप्रदान तसेही सोपे झाले आहे. त्यातून समस्यांवर मात करण्याचा मार्ग सापडू शकतो. मंदीसारख्या समस्यांवर तर, सोशल मीडियावरील अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सुरूदेखील झाले आहे.
सध्या तर, देशावर मंदीचे सावट दाटले आहे. अंडरगारमेंटचा- म्हणजे चड्ड्या-गंजीफ्राॅकांचा वगैरे- खप कमी झाल्यामुळे ही बाब स्पष्ट झाली हे जेव्हा वाचनात आले, तेव्हा मनात एक विचार आला. मंदीचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.
अंडरगारमेंटची म्हणजे चड्डी-बनियनची, साॅक्सची- म्हणजे पायमोज्यांची- एखाद दुसरी जादा जोडी प्रत्येकाने थेट मंदी सुरू होण्याआधी आज विकत घेऊन ठेवली तर? हातात पैसा खेळता आहे तोवर हे केले, तर मंदीच्या काळात पैसा जपण्याची जी कसरत करावी लागते, ती टाळणे शक्य होईल, आणि या मोहिमेस चळवळीचे रूप येईल.
ही चळवळ वाढली तर अंडरगारमेंटचा खप वाढेल आणि मंदीचे पहिले लक्षण जे मानले जाते, तेच संपुष्टात येईल.
तुम्हाला काय वाटते?

Tuesday, August 20, 2019

लाल परी...

दादरच्या रस्त्यावरून संध्याकाळनंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एसटीच्या लालपरी रातराण्या पाहिल्या की मला आजही, इतक्या वर्षांनंतरही गावाकडची आठवण येते, आणि मी उत्सुकतेने गाडीचा बोर्ड पाहू लागतो. कधीकधी तो वाचता येत नाही. मग गाडीच्या मागे नंबरखालची अक्षरे शोधतो, आणि देवरूख डेपोची गाडी दिसली की मनानेच गावाकडच्या आठवणींचा, भूतकाळाचा प्रवास सुरू होतो...
... आजही तसेच झाले. देवरूख डेपोची ‘मुंबई-देवळे मार्गे -पाली’ गाडी दिसली, आणि आठवणींचे सारे झरे जिवंत झाले.
या गाडीने मी पूर्वी मुंबईहून देवरूखला, देवरूखहून साखरप्याला, पालीहून देवळ्याला, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर असंख्य वेळा प्रवास केला आहे. या गाडीचा जिव्हाळा वाटण्याचे ते एक कारण आहेच, पण माझ्या दृष्टीने या गाडीचे एका अविस्मरणीय इतिहासाशी नाते आहे. माझ्या आठवणींत ते नाते आजही ताजे आहेच, पण एका हरवलेल्या काळाची ती हळवी आठवणही आहे!
... आज ही गाडी दिसली, आणि मला खूप जुना, बहुधा १९६५-७० च्या काळातला तो प्रसग आठवला. मी तो पाहिलेला नाही. पण तो जसा ऐकला, तसाच्या तसा घडलेला असणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही.
**
मुंबई सेंट्रलवर या गाडीची वाट पाहात एक गृहस्थ उभे होते. खाकी शर्ट, खाकी हाफ पॅन्ट, किंचित वाढलेले दाढीचे खुंट डोक्यावरचे तुरळक बारीक केस आणि पाच फुटांहून कमी उंचीचे हे गृहस्थ फलाटावर बाकड्यावर बसले होते. गळ्यातल्या पट्ट्याच्या पिशवीत भरलेले कपडे एवढेच सोबतचे सामान!... गाड्या फलाटावर लागत होत्या आणि प्रवाशांची धावाधाव सुरू होती. हे गृहस्थ शांतपणे ते सारे मनात जणू टिपून घेण्यासाठी निरीक्षण करत बसले होते.
... अचानक कुणीतरी खुणेनंच त्यांना बोलावलं. एक उंची कपड्यातला, बूट घातलेला माणूस आपली बायको व मुलांसोबत उभा होता. बाजूला एक मोठी बॅग होती. त्या माणसाने खुणेनेच या गृहस्थास बोलावले, आणि हे शांतपणे उठून खांद्यावरची आपली पिशवी सावरत त्याच्यासमोर उभे राहिले.
‘ही बॅग गाडीवर टाक!’... त्याने हुकमी आवाजात या गृहस्थास फर्मावले.
क्षणभर नजर चमकली. चेहऱ्यावर एक मिश्किल हास्यरेषाही उमटली, आणि काहीच न बोलता या गृहस्थांनी वाकून ती बोजड बॅग डोक्यावर घेतली व बघता बघता बसगाडीची शिडी चढून बॅग गाडीच्या टपावर ठेवून ते खाली उतरले...
खांद्यावरच्या चतकोर रुमालाने चेहरा पुसत त्यांनी त्या पॅन्टबूटवाल्याकडे पाहिले. पुन्हा डोळ्यात तीच चमक, अन् चेहऱ्यावर तेच मिश्किल हास्य...
त्या पॅन्टबूटवाल्याने खिशात हात घातला, अन् रुपयाची नोट या गृहस्थासमोर धरली.
हमाली म्हणून!
हे गृहस्थ मंद हसले...
त्यांनी मानेनेच रुपया घेण्यास नकार दिला, आणि म्हणाले, ‘सुदैवाने मी आमदार असल्याने पुरेसे मानधन मला मिळते. मी तर तुम्हाला केवळ मदत केली आहे!’
पॅन्टबूटवाल्याचा खजिल चेहरा न पाहाताच ते बाजूला फलाटावर लागलेल्या मुंबई देवळे मार्गे पाली गाडीत चढले!
**
त्यांचे नाव होते, आमदार शशिशेखर काशिनाथ आठल्ये. तेव्हाच्या लांजा मतदार संघात त्यांना लहानथोर माणसे ‘आठल्ये गुरुजी’ म्हणूनच ओळखत. समाजवादी विचारांचे आठल्ये गुरुजी १९५७, ६२, व ६७ अशा तीन टर्ममध्ये आमदार होते. पण आयुष्याच्या अखेरीस, सन २०११ मध्ये, वयाच्या ९९ व्या वर्षी, अखेरचा श्वास घेतला तेव्हा उपचाराचे पैसे देण्यासाठी त्यांच्या कुटुंबास जमवाजमवच करावी लागली होती!!
... म्हणून या गाडीचे एका इतिहासाशी नाते आहे, असे मी मानतो!!