Monday, June 28, 2021

राष्ट्रनीतीचा पांथस्थ!

 


प्रदीर्घ काळ परकीय राजसत्तेच्या अमलाखाली राहिलेल्या भारतीय समाजाच्या मानसिकतेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात तीन विचारधारा विकसित झाल्या. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारतीय जनतेस विकासाची, विद्येची वेगळी दृष्टी प्राप्त झाली असे मानणाऱ्या एका वर्गास ब्रिटीश राजवट ही गुलामगिरी असली तरी विकासाची संधी वाटत होती. ब्रिटीश विचारधारा, त्यांची शिक्षणपद्धती आणि राज्यकारभाराची रीत भारतासारख्या परंपरावादात गुरफटून नव्याच्या शोधापासून अलिप्त राहिलेल्या देशाकरिता अनुकरणीय आहे, असे मानणारा हा वर्ग होता. त्याच दरम्यान, भारताची संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची पुनर्स्थापना केल्याखेरीज समाजाचा विकास होणार नाही असे आग्रही प्रतिपादन करणारा दुसरा वर्गही होता. हा वर्ग विदेशी, विशेषतः युरोपीय जीवनशैलीचा कठोर टीकाकार आणि भारतीय संस्कृतीचा कट्टर पुरस्कर्ता होता. या वर्गाने संस्कृतीरक्षणाचा वसा घेऊन स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्याचे ध्येय जपले, तर तिसरा एक वर्ग जहाल क्रांतिकारी विचारसरणीतून व आंदोलनात्मक मार्गांनी स्वातंत्र्याचे लढे लढत होता. सहाजिकच, याच काळात अशा तीन वर्गांची राजकीय बैठक तयार होत गेली. डाव्या विचारधारेच्या अनुयायांनी साम्यवादी पक्षांची कास धरली, मध्यममार्गी विचारसरणीचे लोक काँग्रेससोबत राहिले, तर उजव्या, किंवा हिदुत्ववादी विचारांचे पाईक असलेल्यांनी हिंदु महासभेस जवळ केले.
स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या सुमारे पाऊणशे वर्षांच्या वाटचालीचे राजकीय दृष्टिकोनातून निरीक्षण केले तर असे आढळते की सत्ता आणि प्रतिनिधित्वाच्या स्तरावर या तीन वर्गांमध्ये कमीअधिक अंतर दिसत असले तरी देशाच्या संपूर्ण राजनीतीमध्ये मात्र या विचारांचेच अस्तित्व दखल घेण्याएवढे अधोरेखित होऊन राहिलेले आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी देशातील श्रमिक, मजूर, शेतकरी आणि वंचित समाजास आपल्यासोबत जोडण्याचे प्रयत्न केले, मात्र, देशातील परंपरावर अंधश्रद्धांचा शिक्का मारून त्या नष्ट करण्याच्या प्रयत्नांत डावे पक्ष फारसे यशस्वी ठरले नाहीत. कम्युनिस्ट पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले अनेकजण स्वातंत्र्यानंतर वैचारिक मतभेदांमुळे वेगळ्या चुली मांडून बसले. ब्रिटीश राजसत्तेशी संघर्ष करण्यासाठीच १८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसवर पहिल्या दोन दशकांत मध्यममार्गी व समन्वयवादी विचारांचे वर्चस्व होते. पुढे स्वदेशी आंदोलनाच्या रूपाने काँग्रेसला लढ्याचे एक प्रभावी अस्त्र हाती आले, आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनेही समाजातील मध्यमवर्गीय, वंचित गटांमध्ये आपले स्थान रुजविले. या देशाच्या परंपरांना धर्माचे अधिष्ठान आहे, देशाच्या समाजावर हिंदु धर्म आणि संस्कृतीचा पगडा आहे, त्यामुळे धार्मिक परंपरा आणि संस्कृतीला अव्हेरून व परंपरा पुसून कोणताच राजकीय पक्ष देश चालवू शकणार नाही, त्यामुळे हिंदुत्वाचे रक्षण करणे व परंपरांचा अभिमान जागृत ठेवणे ही गरज असल्याचे मानणाऱ्या हिंदुत्ववादी विचारसरणीस पोषक असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळातही सुरू होते. त्यातच, राजकीय लांगूलचालनाच्या प्रयत्नांमुळे देशात मुस्लिम लीगचा प्रभाव वाढू लागला होता. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमुळे हिंदुत्वाचा आणि हिंदु समाजसंघटनाचा विचार देशभर पसरू लागला. या विचारास होणारा राजकीय विरोध आणि त्यातून निर्माण होणारे संघर्षाचे प्रसंग टाळण्याकरिता, राजकीय मंचावर राजकारणाच्या माध्यमातूनच विरोधाची धार कमी करणे शक्य होईल या जाणिवेतून राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय संघ धुरिणांनी घेतला, आणि २१ ऑक्टोबर १९५१ या दिवशी दिल्लीतील एका प्रतिनिधी संमेलनात भारतीय जनसंघाची स्थापना करण्याचे जाहीर झाले. राजकीय मंचावर हिंदु राष्ट्रवादाचा, म्हणजे उजव्या विचारसरणीचा उदय झाला, आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष झाले. राष्ट्रवादी हिंदुत्वाच्या विचारास राजकीय दिशा देण्याची जबाबदारी संघाने जनसंघावर सोपविली, आणि हिंदुत्व रक्षणाचा झेंडा खांद्यावर घेऊन संघर्ष करणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जबाबदारीचे ते आव्हान स्वीकारले. जनसंघाच्या रूपाने राजकीय मंचावर हिंदुत्ववादी राष्ट्रनीतीचा विचार ठळक झाला.
स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत उजव्या, हिंदुत्ववादी पक्षांच्या पदरी निराशादायक निकाल पडले. स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षातून प्राप्त झालेल्या जनाधाराचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. त्या निवडणुकीत काँग्रेसला ३६३ जागांवर विजय मिळाला, तर जनसंघ जेमतेम तीन जागा मिळवू शकला. राजकीय लढाई मोठी आहे, जनाधार मिळविण्यासाठी महत्प्रयास करावे लागणार आहेत, याची जाणीव डॉ. मुखर्जींसह सर्वच नेत्यांना होती. मात्र, हिंदुत्वाच्या विचारानेच पक्षाला राजकीय बैठक द्यायची हा निर्धार पक्का होता. १९५३ मध्ये काश्मीर आंदोलनात डॉ. मुखर्जींच्या संशयास्पद मृत्यूमुळे जनसंघास मोठा धक्का बसला, पण डॉ. मुखर्जी यांनी जनसंघास दिलेल्या भारतीय राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे पुनरुत्थान या दोन विचारधारा मात्र पुढे भारतीय राजकारणात परिवर्तन घडवून आणण्याइतक्या सक्षम बनल्या. याच विचारांचा वारसा घेऊन पुढे पं. दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, पं. मौलिचंद्र शर्मा आदी नेत्यांनी जनसंघाची राजकीय विचारधारा जनमानसात रुजविण्यासाठी परिश्रम घेतले, आणि स्वातंत्र्यानंतर सुमारे तीन दशके देशावर असलेली काँग्रेसची पकड हळुहळू सैलावत गेली. आणीबाणीच्या काळात स्थापन झालेल्या जनता पार्टीच्या प्रयोगाने प्रस्थापित काँग्रेसला जोरदार झटका मिळाला. पुढे वैचारिक मतभेदातून जनता पार्टीमधून जनसंघास बाहेर पडावे लागले, आणि ६ एप्रिल १९८० या दिवशी संघ परिवारात भारतीय जनता पार्टी या नव्या नावाने जनसंघाचा नवा अवतार दाखल झाला. १९२५ ते १९५२ आणि १९५२ ते १९८० या तीन टप्प्यांत हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा विचार घेत धीराने वाटचाल करणारा भाजप आज सत्तेपर्यंत पोहोचला आहे, हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या त्यागाचा, द्रष्ट्या विचारांचा विजय म्हणावा लागेल. श्यामाप्रसादजींचे व्यक्तिमत्व, त्यांचे चिंतन, आणि ‘हिंदुत्व हेच भारतीयत्व’ हा त्यांचा विचार म्हणजे प्रखर हिंदुत्ववादाचे प्रतिबिंब आहे. जम्मू-काश्मीरच्या अलगतावादास खतपाणी घालणारे ३७० वे कलम रद्द करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास आपण तयार आहोत, असे तडाखेबंद भाषण २६ जून १९५२ रोजी त्यांनी संसदेत केले, आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू येथे झालेल्या विशाल मेळाव्यातही त्याच विचारांचा पुनरुच्चार केला. आपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ८ मे १९५३ रोजी त्यांनी जम्मू काश्मीरकडे प्रयाण केले, आणि त्यांना अटक झाली. तुरुंगात असतानाच २३ जून १९५३ रोजी त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला.
जातपात, धर्म, प्रांतभेदाच्या पलीकडे सर्वांकरिता जनसंघाची दारे खुली आहेत, असे डॉ. मुखर्जी यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले होते. भारताची संस्कृती आणि मूल्यांच्या प्रतिष्ठेतच भारताचे भविष्य सामावलेले आहे. जसे आपण धर्म, किंवा कायद्याचा आदर करतो, तसाच आदर भारतीय संस्कृतीचा केला पाहिजे, आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या भारतीय मूल्यांचे पालन केले पाहिजे, असे ते या भाषणात म्हणाले होते. जात, धर्म, विचार आदी भेदभावांपासून राजकारणाने अलिप्त राहिले पाहिजे, असा विशाल विचार मांडून देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या श्यामाप्रसादजींच्या स्वप्नातील भारतात हिंदु राष्ट्रवादाचा त्यांचा विचार पुढे नेत सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या विचारांनी आज अग्रस्थान मिळविले आहे, ही त्यांच्या तपश्चर्येचीच पुण्याई आहे. त्यामुळे, भारतीय राजकारणातील तेजस्वी सूर्य म्हणून डॉ. मुखर्जी यांच्या स्मृती कायमच तजेलदार राहतील..

https://www.navarashtra.com/featured-stories/dr-shyamaprasad-mukherjee-punyatithi-panthastha-of-national-politics-nrvb-146017/

No comments: